संघर्ष !! वृत्तपत्र विक्रेत्यांच्या न्यायासाठी !! बालाजी पवार

0
204

!! वृत्तपत्र विक्रेत्यांच्या न्यायासाठी संघर्ष !!

स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या वर्धा व सेवाग्राम या पावन भूमीत वृत्तपत्र विक्रेत्यांची मातृसंस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य स्तरीय अधिवेशन दिनांक 26 व 27 जानेवारी रोजी होत आहे. या ऐतिहासिक शहराची आणखी एक आमच्या साठी महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या कामाला या पावन भूमीतूनच 2004 पासून गती मिळाली. त्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आदरणीय सुनील पाटणकर यांनी! सन 2004 साली वर्धेत वृत्तपत्र विक्रेत्यांचे राज्य स्तरीय अधिवेशन झाले होते. त्या अधिवेशनात अनेक घडामोडी झाल्या होत्या. वृत्तपत्र विक्रेत्यांचे नावाला राज्याचे फेडरेशन होते त्याची कार्यकारिणी बरखास्त करून नवीन जबाबदारी उरणचे गोपिनाथजी चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आली. आणि येथूनच वृत्तपत्र विक्रेता संघटनेचं खरं राज्यस्तरीय काम सुरू झालं. जिल्हे, तालुके, गावा गावात, खेड्यांपर्यंत काम पोहचवण्यासाठी नविन पदाधिकारी कामाला लागले. वर्धा येथूनच सुरू झाले आणि नांदेड येथे 2006 ला झालेल्या अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योग तथा सांस्कृतिकमंत्री अशोकरावजी चव्हाण लाभले होते. ख-या अर्थानं 2004 सालापासून राज्य वृत्तपत्र संघटनेच्या कामाची झालेली सुरुवात आजपर्यंत सुरूच आहे आणि सर्व देशभर महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटनेचे काम पोहचले आहे असे म्हणायला हरकत नाही. इथे कानपूरचे वितरक आवाजाचे संपादक राकेश पांडेजी उद्घाटक म्हणून उपस्थित आहेत. सुरूवातीला जे वृत्तपत्र विक्रेता फेडरेशन होते त्याची 2009 ला कामगार कायद्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना म्हणून स्थापना झाली.

वर्धा येथे होत असलेले अधिवेशन दोन वर्षांपूर्वी ठरले होते. शहर संघटनेला
पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत यानिमित्ताने 2021 च्या अधिवेशनाचे यजमानपद मिळावे असे वर्धेकरांचे म्हणने होते. ते मान्य करण्यात आले होते. अधिवेशन भव्य दिव्य करण्याचा विचार पाटणकर यांनी व्यक्त केला होता. पण त्यात कोरोणाने आणली अडचण! अधिवेशन होते कि नाही, घ्याव कि नाही. असे मतं समोर येत होती. ऑनलाईन बैठका झाल्या आणि ठरले कि काहीही झाले तरी अधिवेशन वर्धा येथे होणार. तयारी सुरू झाली. कोरोनाचा धोका ओळखून अधिवेशनाचा कार्यक्रम ऑनलाईन दाखवायचा आणि उपस्थिती संख्या कमी प्रमाणात ठेवायची असेही ठरवण्यात आले. सगळ्यां अडचणींवर मात करत आज कोरोनाची काळजी घेऊन दोन दिवस अधिवेशन ‌चालणार आहे. त्यात राज्य संघटनेच्या कामाची पुढील दिशा ठरवली जाईल.

कोरोनामुळे देश संकटातून जात असतांना अनेक उद्योग, व्यवसाय थांबले पण छपाई माध्यमांतील महत्त्वाचा घटक असलेला वृत्तपत्र विक्रेता संकट अंगावर घेऊन न थांबता ‌काम‌ करत राहीला. मनात खूपच भिती होती लोकांनी रस्ते बंद केले होते. लोक वस्त्याईत, गल्लीत, बिल्डींगा, काॅम्पलेक्स मध्ये येवू देत नव्हते. सगळं जग थांबलं पण डाॅक्टर, नर्स, पोलिस, आशा वर्कर, वृत्तपत्र विक्रेता व अत्यावश्यक प्रशासकीय यंत्रणा चालू होते. सगळे कोरोणा योध्दे झाले अनेकांना कोरोणा योद्धे म्हणून प्रमाणपत्र, पुरस्कार भेटत होते. पण वृत्तपत्र विक्रेत्याची कोणी दखल घेतांना दिसले नाही. उलटं वृत्तपत्र विक्रेत्यांवर काम करत नसल्यास धमक्या, दादागिरीची भाषा अनेक ठिकाणी ऐकायला मिळाली. त्यावरही माझ्या वृत्तपत्र विक्रेत्यांनी मात केली.
पण इथं सांगायला दु:ख होते आमचे काही सहकारी आम्हाला कायमचे‌ सोडून गेले. त्यात जवळचा साथी, आवाजाला प्रतिसाद देणारा, मंत्रालयातील कामाची जबाबदारी नेटाने पार पाडणारा सक्रीय सहकारी सदानंद नंदूर हा ही गेला. तो गेल्यामुळे राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे न भरून निघणारे नुकसान झाले.

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील असंघटित कामगार असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करावे तसेच अनेक प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने झाली. त्याची दखल न‌ घेतल्याने 2019 च्या नागपूर येथे झालेल्या वृत्तपत्र विक्रेता राज्य स्तरीय अधिवेशनात तत्कालीन कामगार मंत्र्याच्या घरावर मोर्चा काढण्याचे ठरले. याची दखल घेऊन लगेच सह्याद्री अतिथी गृहावर कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी बैठक बोलावली. पंधरा वर्षांपासूनच्या संघर्षमय प्रयत्नामुळे वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी योजना अंमलबजावणी करीता अभ्यास समिती गठीत करण्यात आली. हे राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेला पहिले यश मिळाले असे म्हणायला हरकत नाही. वृत्तपत्र विक्रेता समितीने बनवलेला अहवाल सप्टेंबर 2019 मध्ये कामगार मंत्रालयात सादर करण्यात आला. पण‌ दुर्देवाने विधानसभेच्या निवडणूका लागल्या. सरकार बदललं तसं आमचं काम थांबलं. तरीही आदरणीय संजय केळकर यांच्या उपस्थितीत राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने 6 मार्च 2020 ला विधी मंडळात विद्यमान कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना भेटून अहवाल सादर केला. संघटनेच्या वतीने हा अहवाल लागू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. त्याच महिन्यात कोरोणाने घेरलं. दहा महिने झाले सर्व कामे थांबली आहेत. वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी योजना अंमलबजावणी करीता अभ्यास समितीने तयार केलेला अहवाल राज्य सरकारने लागू करावा यासाठी सक्रिय होणे गरजेचे आहे. असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम 2008 या कायद्याखाली सदरील समिती स्थापन करण्यात आली होती. या अहवालानुसार वृत्तपत्र विक्रेत्यांच्या असंघटित कामगार म्हणून ताबडतोब नोंदण्या झाल्या पाहिजेत. वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन केले पाहिजे. गटई कामगारांप्रमाणे मोक्याचे ठिकाणी पेपर स्टॅल उपलब्ध करून देण्यात यावेत. अस्तित्वात असलेले स्टाॅल अतिक्रमणात गृहित धरू नयेत. तसेच रस्ता रूंदीकरण अथवा विविध विकासात्मक योजना अंतर्गत स्टाॅल हलवण्यापुर्वी सोयीची पर्यायी व्यवस्था करून द्यावी. शासकीय आवारातील बुकस्टाॅल, एस टी बुकस्टाॅल, रेल्वे बुक स्टाॅलकरीता संघटनेच्या निविदेस प्राधान्य द्यावे. शासकीय घरकुल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी घराचा राखिव कोटा ठेवावा. वृत्तपत्र विक्री व्यवसायास अत्यावश्यक असणारे साहित्य- अच्छादित स्टाॅल, सायकल, रेणकोट, स्वेटर इत्यादी वृत्तपत्र विक्रेत्यांना मिळावे. विपरीत परिस्थितीत कर्तव्य पार पाडत असल्यामुळे वरचेवर उद्भवू शकणारे आजारपण आणि त्यासाठी करावा लागणारा इलाज, औषधपाणी, अशा वैद्यकीय खर्चासाठी कॅशलेस मेडिक्लेम सुविधा किंवा आर्थिक मदत विक्रेत्यांना मिळावी. अशा प्रकारच्या मागण्या या अहवालात नमूद करण्यात आल्या आहेत. हा अहवाल लागू झालाच पाहिजे. असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या बाबतीत सरकार गंभीर नाही. सरकारचे असंघटित असलेल्या वर्गांसाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे.

मित्रहो आत्ता या विषयावर विचार होणे गरजेचे आहे. कारण आज‌ नाही तर कधीच नाही. म्हणून या ठिकाणी होत असलेल्या अधिवेशनात पुढील दिशा ठरवली पाहिजे. कारण मुंबई येथे 2018 ला झालेल्या वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या राज्य स्तरीय आधिवेशनात राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तेंव्हा त्यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्र्वासन दिले होते. पण ते विसरले आहेत. त्यांना आठवण करून देण्यासाठी वृत्तपत्र विक्रेत्यांना वेळप्रसंगी आंदोलनात्मक भुमीका सुध्दा घ्यावी लागेल.

छपाई माध्यमांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वृत्तपत्र विक्रेता आवश्यक आहे. भारतात घटनेनुसार वृत्तमानपत्रांना स्वातंत्र्य आहे तसे वृतमानपत्रांना शेवटच्या वाचकांपर्यंत पोहोचवणा-या वृत्तपत्र विक्रेत्यांना घटनेनुसार असंघटित कामगार असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना चांगले जगता यावे यासाठी वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ करावे असाही कायदा आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांना सन्मान मिळाला पाहिजे यासाठी सुध्दा राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना धडपडत असते. वृत्तपत्र विक्रेत्यांना सन्मान मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेने भारतरत्न डॉ एन पी जे‌ अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी म्हणजे 15 ऑक्टोबर 2018 ला वृत्तपत्र विक्रेता दिवस सुरू केला. वृत्तपत्र विक्रेता दिवसाचा शुभारंभ नांदेड येथील कुसुम सभागृहात तात्कालिन खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते हजारो वृत्तपत्र विक्रेता बांधवांच्या साक्षिने झाला होता. हा दिवस आज देशातील बाविस राज्यात भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिन शासनाने साजरा करावा यासाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने केंद्र सरकारकडे पत्र व्यवहार चालू आहे. माध्यमांतील महत्त्वाचा घटक असलेल्या वृत्तपत्र विक्रेता बांधवांनाही सन्मान मिळावा यासाठी शासनाने वृत्तपत्र विक्रेता दिवस साजरा करण्यासाठी निर्णय घ्यावा. असे वृत्तपत्र विक्रेत्यांचे अनेक प्रश्न घेऊन लढतांना महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना देशातील सामाजिक चळवळीत सुध्दा सहभागी होते. मग ते काम देशहिताचे किंवा जनतेच्या हिताचे असले पाहिजे.

वर्धा येथे होत असलेल्या अधिवेशनातून वृत्तपत्र विक्रेत्यांना पुढील काळात काम करण्याची उर्जा मिळेल. दर वर्षी होणाऱ्या संघटनेच्या अधिवेशनात महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत आणि ते पुर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना ताकदीने कार्य करत आलेली आहे. तसेच आज वर्धा येथे होत असलेल्या अधिवेशनात वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी जी दिशा ठरवली जाईल त्या दिशेने महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना वाटचाल करेल आणि यावर्षी राज्य सरकारला वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी भाग पाडेल. मग वेळप्रसंगी वृत्तपत्र विक्रेता संघटनेला रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल पण असंघटित कामगार असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना त्यांचे‌ हक्क मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. कारण महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचं‌ ब्रिद वाक्यच आहे उत्कर्षासाठी संघर्ष! जय वृत्तपत्र विक्रेता!
वृत्तपत्र विक्रेता एकजुटीचा, विजय असो!!

बालाजी पवार
सरचिटणीस
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना, नांदेड
मो. 9890860124

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here