जिल्हा नियोजनचा विकास निधी 100 टक्के खर्च करा – पालकमंत्री यांचे निर्देश

0
148

100 टक्के विकास निधी प्राप्त होणाऱ्या मोजक्या जिल्ह्यात चंद्रपूरचा समावेश
 घरकुल योजनेसाठी मोफत रेती
 जिल्ह्यासाठी 405 कोटी 2 लक्ष 95 हजार रुपयांचा नियतव्यय मंजूर
चंद्रपूर, दि. 25 : महाराष्ट्रात फक्त काही मोजक्याच जिल्ह्यांना जिल्हा नियोजनचा 100 टक्के विकास निधी प्राप्त झाला असून त्यात चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत चंद्रपूर जिल्ह्यासाठी 405 कोटी 2 लक्ष 95 हजार रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला होता, हा संपुर्ण निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत निधी खर्च झाला नाही, मात्र विकास कामांसाठी प्राप्त झालेला निधी 31 मार्च पुर्वी खर्च करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज प्रशासकीय यंत्रणेला दिले.

जिल्हा नियोजन विकास परिषदेची बैठक नियोजन भवन येथे आज संपन्न झाली. यावेळी पालकमंत्री वडेट्टीवार बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, खा. बाळू धानोरकर, खा. अशोक नेते, लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार, आ. किशोर जोरगेवार, आ. सुभाष धोटे, आ. प्रतिभा धानोरकर, आ. रामदास आंबटकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालीकेचे आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी ग.रु.वायाळ प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री वडेट्टीवार यांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सर्व घरकुल योजनांना मोफत रेती देण्याचेही निर्देश सर्व उपविभागीय अधिकारी यांना दिले. यावेळी त्यांनी विविध विभागाचा आढावा घेतला.
बैळकीत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी क्षेत्रावर निधी वाढवून मिळणेबाबत तसेच विदर्भ विकास मंडळ पुन्हा सुरू करण्याची शिफारस जिल्हा नियोजन समितीने मंत्रीमंडळाकडे करण्याची मागणी केली. तर आ. सुभाष धोटे यांनी आचारसंहितेमुळे निधी खर्च करता येत नाही, त्यामुळे ज्या भागात निवडणूक आहे त्या भागापुरतीच आचारसंहितेची अंमलबजावणी करून इतर भागात विकास निधी खर्च करण्यास मोकळीक देण्याची मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here