अनाथ व मतिमंद मुलांच्या न्याय हक्का साठी अनेक संघटनेचे उद्या अर्धनग्न आंदोलन

163

चंद्रपूर – लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्थाद्वारा संचालित नागभीड येथील स्वामी विवेकानंद बालगृहचे संस्था अध्यक्ष मंगेश पेटकर व सचिव पुरुषोत्तम चौधरी हे 25 जानेवारीपासून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेले आहेत.
उद्या उपोषणाचा आठवा दिवस असून आतापर्यंत शासनाकडून कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याने आमरण उपोषणकर्ते मंगेश पेटकर व पुरुषोत्तम चौधरी सह संस्थेतील कर्मचारी, अपंग विद्यार्थी व विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना एकत्र येत 1 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करणार आहे.
वर्ष 2011 पासून संस्थाचालक हे शासनातर्फे मिळणारे अनुदानासाठी लढा देत आहे.
कारण अजूनही संस्था ही कायम विनाअनुदानित तत्वावर कार्य करीत असून आजपर्यंत अपंग व मतिमंद मुलांचा खर्च संस्थाचालकांनी स्वखर्चाने केला मात्र शासनाने अनुदान देण्यास दिरंगाई केली.
मात्र संस्थाचालकांनी न खचता अनुदानाची रक्कम मिळावी यासाठी न्यायालयीन लढा दिला व हा लढा जिंकला सुद्धा मात्र निष्ठुर प्रशासनाने कोणतेही कारण न देता संस्थेला अपात्र करीत अनुदान देण्यास नकार दिला.
आज संस्थाचालक कर्जबाजारी स्थितीत आले असून सदर संस्थेत 18 वर्षे पूर्ण केलेले मूल असल्याने त्यांचं पुनर्वसन शासनाने करायला हवं मात्र शासन याबाबत उदासीन आहे.
याकरिता संस्थाचालकांनी आमरण उपोषणाचे हत्यार उगारले असून सोमवारी 1 फेब्रुवारीला दुपारी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्याचे ठरविले या आंदोलनाला सामाजिक व राजकीय क्षेत्राचा पाठिंबा मिळाला आहे.