कोरोनामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांनी शोधल्या उत्पन्नाच्या नव्या वाटा

0
152

सांगली : विकास सूर्यवंशी 

संकटातून नवा मार्ग मिळतो, असे म्हणतात, अगदी तसाच अनुभव वृत्तपत्र विक्रेत्यांबाबत आला आहे. कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं इतक्या अडचणीत सापडलेल्या वृत्तपत्र विक्री व्यवसायाने विक्रेत्यांना नव्या व्यवसायाची गरज भासवून दिली. अनेक विक्रेत्यांनी या काळात वेगवेगळे व्यवसाय सुरू केले, काहींनी पार्ट टाईम नोकरी सुरू केली, तर काहींनी याच व्यवसायाला जोडून विविध वस्तूंची घरपोच सेवा सुरू केली. त्यामुळे कोरोना हे मोठं संकट म्हणून समोर आलं खरं; मात्र त्यातही नवनव्या संधी शोधण्याची संधी मिळाली, असेच म्हणावे लागेल.
संपूर्ण जगात; विशेषतः आपल्या देशात, राज्यात तरी 2020 हे वर्ष ऐतिहासिक अडचणींचे गेले. अजूनही या अडचणी संपलेल्या नाहीत; मात्र आता थोडी उसंत मिळत आहे, रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे हे संकट पाठीवर टाकत नव्या दमाने आयुष्याची वाटचाल करावी लागत आहे.
कोरोनाचे फार मोठे संकट आले. एरव्ही अनेक नैसर्गिक संकटे येत असतात व जात असतात; मात्र संपूर्ण वृत्तपत्र वितरणच ठप्प होईल, असे संकट कोरोनाच्या रूपाने पहिल्यांदाच आले. महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर पुणे, मुंबई, नागपूर अशा मोठ्या शहरांत फार मोठा फटका वृत्तपत्र विक्री व्यवसायास बसला. या काही शहरांमध्ये बरेच दिवस वृत्तपत्रांची छपाईच बंद ठेवण्यात आली. उर्वरित महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी वृत्तपत्रांची छपाई सुरू होती; मात्र खपावर मोठा परिणाम झाला होता. अनेक शहरात वृत्तपत्रांचा खप 50 टक्क्यांहून खाली आला होता. एरव्ही कधी फारशी तेजी-मंदी नसणारा हा व्यवसाय प्रचंड मंदीत सापडला. वृत्तपत्रांमुळे कोरोना पसरतो, या अफवेमुळे अनेकांनी वृत्तपत्र घेणे थांबवलं. काही ठिकाणी अगदी ऐंशी टक्क्यांपर्यंत वृत्तपत्र विक्री कमी झाली. उर्वरित मोजक्या लोकांसाठी वृत्तपत्र पोहोच करण्यासाठी जाणंही अशक्य होतं. त्यामुळे काही शहरांमध्ये वृत्तपत्र वितरण ठप्प झालं, तर अनेक ठिकाणी त्यामध्ये प्रचंड घट झाली. साहजिकच त्याचा फार मोठा परिणाम वृत्तपत्र विक्रेत्यांच्या उत्पन्नावर झाला. सरकारी नोकरदारांच्या पगारात काहीही कपात झाली नाही, खाजगी नोकरदारांच्या पगारात काही अंशी घट झाली; मात्र ‘कमवावे तेव्हा खावे’ अशी अवस्था असणार्‍या या वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी ही घट प्रचंड संकटात टाकणारी ठरली.
मुळातच अनेक अडचणींवर मात करीत, सतत जीव धोक्यात घालून रात्री-अपरात्री राबवणारा हा वृत्तपत्र विक्रेता तसा खंबीरच; मात्र या संकटाने जरा घाबरलाच. कारणही तसेच आहे. कारण मुळातच कसंतरी जगणारा हा घटक आर्थिक संकटात सापडला.
कोरोनाच्या या संकटावर मात्र करण्याचा निर्धार करीत वृत्तपत्र विक्रेत्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली. अनेकांनी जीव धोक्यात घालून वृत्तपत्र वितरण सुरूच ठेवले. जे काही उत्पन्न मिळते, ते जमवले आणि इतर मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सर्वाधिक उपयोग झाला तो वृत्तपत्र घरपोच करण्याच्या मूळच्या कामाचा. याच कामाचा आधार घेत कोरोना काळात लोक बाहेर पडत नव्हते, त्यावेळी लोकांना आवश्यक गोष्टी, बाजार घरपोच करण्याचे काम व्यवसाय म्हणूनच अनेकांनी सुरू केला. काहींनी वृत्तपत्र स्टॉलवरच भाजी, दूध, बेकरी पदार्थ आदींची विक्री सुरू केली. काहींनी या वस्तू ऑर्डरप्रमाणे घरपोच करणे सुरू केले. मुळातच असणारी विश्‍वासार्हता कामी येऊ लागली. घटलेले उत्पन्न वाढू लागले. काहींनी तर वृत्तपत्र विक्री व्यवसायातील साखळीचा वापर करून ऑनलाईन विक्री व घरपोच सेवेसाठी कंपन्या निर्माण करून स्वतःचे अ‍ॅप तयार केले. कायमस्वरुपी नव्या व्यवसायाशी जोडून घेऊन गेले.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरासह सांगली शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी पाणीपुरी, भेळसह फास्टफूड व घरगुती, चटकदार नवनवे पदार्थ तयार करून आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा व्यवसाय सुरू केला. सुमारे पंचवीस विक्रेते या कामाला लागले. आजही नाना बोंगाणे, सचिन चोपडे, विशाल रासनकर, दिनकर जगदाळे, बंडू शिंगारे, विनायक तांबोळकर (मिरज), शिवाजी जाधव (येलूर) यांच्यासह अनेकजण हा व्यवसाय करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या संकटावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या घरातील महिलांनी यासाठी मोठी साथ दिली.
वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सतत प्रयत्न करणार्‍या सुनील पाटणकर (वर्धा) यांनीही विक्रेत्यांसाठी या काळात व्यवसायाची नवी संधी निर्माण करून दिली. ऑनलाईन ऑर्डर घेऊन वस्तू घरपोच करणार्‍या मुंबईतील एका संस्थेशी करार केला. घरात रोज लागणार्‍या अनेक दर्जेदार वस्तूंची ऑनलाईन ऑर्डर मिळवण्यापासून त्या वस्तू घरपोच करण्यासाठी ‘घरपोच’ या संस्थेचे काम वर्धा जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातही सुरू केले आहे. आता त्यांची वाटचाल वृत्तपत्र विक्रेत्यांची स्वतःची अशी कंपनी उभारण्याकडे आहे.
ठाण्यासारख्या मोठ्या शहरात दत्ता घाटगे या तरुण वृत्तपत्र विक्रेत्याने स्वतःबरोबरच आपल्या सहकारी विक्रेत्यांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली. भाजी, दूध, किराणा माल, बेकरी पदार्थ अशा अनेक आवश्यक वस्तू घरपोचची सेवा सुरू केली. त्यासाठी ‘भारतरथ’ नावाची कंपनी सुरू केली. इतर स्पर्धकांप्रमाणे ऑनलाईनसह सर्व सेवा सुरू केल्या. त्यामुळे ठाण्यातील वीस ते पंचवीस वृत्तपत्र विक्रेत्यांना कामाची संधी मिळाली. उत्पन्नात भर पडली. यासाठी आमदार संजय केळकर यांनीही मदत केली.
मुंबईमध्येही अनेक वृत्तपत्र विक्रेत्यांनी उत्पन्नाचे नवे मार्ग शोधले. मुंबईत महिला विक्रेत्यांचा मोठा सहभाग आहे. त्यांनीही या संकटात मास्क शिलाई, खाद्यपदार्थ विक्री असे उत्पन्नवाढीचे स्रोत निवडले.
मुंबईतील जीवन भोसले या विक्रेत्याने मास्कविक्रीचे काम सुरू केले. घरी पत्नी व वहिनींकडूनच मास्क शिलाई करून घेतले. त्याची विक्री सुरू केली. त्याचबरोबर हॅन्डग्लोव्हज, महिलांसाठी स्कार्प, सॅनिटायझर व इतरही अनेक वस्तूंची विक्री सुरू केली. अनेकांना अशा संधी निर्माण करून दिल्या, प्रोत्साहन दिले. मुंबईच्या महापौरांनीही यासाठी प्रोत्साहन दिले.
ठाण्याच्या बंटी म्हात्रे यांनी सफेद कांदा, कुरडया, कोकम सरबत, सुके मासे आदींची विक्री, घरपोच सेवा सुरू केली. त्यासाठी कोकणात असणार्‍या आपल्या गावातील उत्पादनांचा आधार घेतला. या विक्रीतून उत्पन्न मिळवत कुटुंब सावरण्याचा प्रयत्न केला.
अंधेरी पूर्व, मुंबईतील महादेव वालम यांनी वृत्तपत्रविक्रीच्या माध्यमातून वाचकांची निर्माण झालेल्या ओळखीचा लाभ घेत होम डिलिव्हरी, मसाले, पापड विक्री आदी माध्यमातून कुटुंब चालवण्याचा प्रयत्न केला.
मुंबई-पुणे आदींसह मोठ्या शहरात व्यवसाय-कामासाठी स्थायिक झालेल्या अनेकांनी यावेळी गावाकडचीही वाट धरली. दुसर्‍यांना कसायला दिलेली जमीन परत घेत स्वतः प्रयोगशील शेती सुरू केली. फळे-भाजीपाला पिकवत तोच मुंबईत नेऊन विक्री करण्याचा प्रयत्न केला.
ही काही मोजकी उदाहरणे आहेत. वृत्तपत्र विक्रेत्यांसह वृत्तपत्र व्यवसायात वृत्तपत्रांच्या कार्यालयात काम करणार्‍या मात्र कोरोनामुळे करण्यात आलेल्या कामगार कपातीचा फटका बसलेल्यांनी असे नवनवे मार्ग निवडले.
चौकट करणे
स्वतः अडचणीत असतानाही जपले सामाजिक भान
कोरोना काळात स्वतः अडचणीत असतानाही अनेक वृत्तपत्र विक्रेत्यांनी सामाजिक भानही जपले. कोरोना योध्दा म्हणून काम केले. जीव धोक्यात घालून वृत्तपत्रांचे वाटप तर केलेच; मात्र इतरही अनेक सामाजिक कामे केली. कोरोनामुळे रुग्णालयात असणार्‍यांच्या प्रतिबंधित क्षेत्रात असणार्‍या घरच्यांना अनेक गोष्टी घरपोच केल्या. गरीब, गरजू लोकांना धान्य, औषधे आदी गरजू वस्तू उपलब्ध करून त्या पोहोच केल्या. त्यामुळे स्वतः अडचणीत असतानाही वृत्तपत्र विक्रेत्यांनी जपलेले हे सामाजिक भान वाखाणण्यासारखे आहेच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here