जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुलं-बाळं व कुटुंबासह डेरा आंदोलन

168

 

चंद्रपूरच्यया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० च्या जवळपास कंत्राटी कामगारांना ७ महिन्यांचा थकीत पगार देण्यात यावा व दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेले किमान वेतन लागू करण्यात यावे या मागण्यांसाठी जनविकास कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात सोमवार दि.८ फेब्रुवारी पासुन डेरा आंदोलन करण्यात येत आहे.कोविड योध्दे असलेल्या कंत्राटी कामगारांना ७ महिन्यांपासून पगार मिळालेले नाही.करोना काळात सुध्दा कामगारांनी जिव धोक्यात घालून विनावेतन काम केले. पगार थकीत असल्याने कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.या कामगारांनी बेमुदत उपोषण केल्यानंतर मार्च २०१९ ला शासनाने किमान वेतन मंजूर केले होते.निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचारामुळे कामगारांना दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेले किमान वेतन अजूनपर्यंत लागू झालेले नाही. भ्रष्ट पद्धतीने मंजूर करण्यात आलेली निविदा आठ महिन्यानंतर शासनाने रद्द केली.यानंतर कंत्राटदाराची नियुक्ती करण्यामध्ये अधिष्ठाता कार्यालये व वैद्यकीय शिक्षण विभागाने जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याने कामगारांचे वेतन थकलेले आहे असा आरोप जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केला.
जिल्ह्याचे पालकमंत्री,राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री,सचिव ,वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक,चंद्रपूरचे जिल्हाधिकारी व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याकडे थकीत पगाराच्या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. अनेक वेळा काम बंद आंदोलनाचा इशारा देऊनही कोविड आपत्तीमध्ये रूग्णसेवा खंडीत होऊ नये म्हणून सहकार्याची
भूमिका घेण्यात आली.एका तांत्रिक अडचणीचे कारण देऊन कामगारांच्या खात्यामध्ये पगार जमा करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. उपासमारीची वेळ आलेल्या कामगारांना पगार देण्याऐवजी कामगारांच्या नियुक्तीबाबत चौकशी करण्याचे फर्मान वैद्यकीय शिक्षण विभागाने काढलेले आहे. यामुळे कामगारांमध्ये संतप्त भावना निर्माण झालेली असून कामगारांच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी घोषणा जनविकास कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केलेली आहे