अशासकीय संस्थांच्या प्रशिक्षण केंद्रांवरील बंदीमुळे हजारो कर्मचारी बेरोजगार

0
166
चंद्रपूर : देशभरात अशासकीय संस्थांमार्फत गेल्या ३५ वर्षांपासून सुरू असलेले अंगणवाडी सेविका प्रशिक्षण केंद्र शासनाने अचानकपणे बंद केले असल्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली आहे. गेल्या तीन वर्षांपासून कर्मचाऱ्यांचे मानधन आणि अनुदान बंद केले असल्याने बालविकासाच्या योजनांमधील मानवी विकास निर्देशांकावर परिणाम होत आहे. त्यामुळे सदर प्रशिक्षण केंद्र पुर्ववत सुरू करण्याची मागणी मूल येथील शिक्षण प्रसारक मंडळातर्फे केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांच्याकडे करण्यात आली आहे.
भारतात हजारो प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून अंगणवाडी कार्यकर्त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात होते. बालविकास विभागातील विविध योजना शेवटच्या टोकापर्यंत राबविण्यासाठी या प्रशिक्षण केंद्रांचा शासनाला उपयोग होत होता. अंगणवाडी सेविका प्रशिक्षण केंद्राच्या (एडब्ल्यूटीसी व एमएलटीसी) माध्यमातून मानवी विकास निर्देशांक वाढविण्यासाठीसुद्धा या प्रशिक्षण केंद्राचे महत्त्वाचे कार्य होते. अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पर्यवेक्षिकांना या माध्यमातून प्रशिक्षण दिल्यामुळे ग्रामीण भागातील बालकांचे आरोग्य व महिलांना आरोग्य सुविधा देण्यासाठी गेल्या ३५ वर्षांपासून हजारो कर्मचारी निरंतर सेवा देत आहेत. मात्र, या माध्यमातून कौशल्य सुधारण्यासाठी प्रयत्न होत असताना सन २०१७-१८ मध्ये सर्व कर्मचाऱ्यांचे मानधन व अनुदान शासनाने स्थगित केले आहे. एवढेच नाही तर प्रशिक्षणाचे कामही बंद केले असून, देशभरातील जवळपास साडेसहा हजार कर्मचारी या निर्णयामुळे बेरोजगार झाले आहे.
शासनाच्या या निर्णयानंतर २०१८ मध्ये ऑक्टोबर महिन्यात कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलनसुद्धा केले होते. परंतु, शासनाने लक्ष दिले नसल्याने हजारो कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी, बालविकासासंदर्भातील योजना राबवितानाही मोठ्या अडचणी निर्माण होत असून, अप्रशिक्षीत कर्मचाऱ्यांमार्फत गावागावात संबंधित विभागाला काम करावे लागत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून तत्काळ अंगणवाडी सेविका प्रशिक्षण केंद्र येत्या ३१ मार्च २०२० पासून नियमित सुरू करावे, अशी मागणी शिक्षण प्रसारक मंडळाने केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांच्याकडे केली आहे. या संदर्भातील निवेदन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब वासाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही देण्यात आले आहे.
चौकट….
ॲड. बाबासाहेब वासाडे यांचा पुढाकार
देशभरातील अशासकीय संस्थांमार्फत सुरू असलेले प्रशिक्षण केंद्रांचे अनुदान बंद करण्यात आल्याने बालकांच्या मानवी निर्देशांकावर परिणाम होत असल्याचे दिसत असल्याने ॲड. बाबासाहेब वासाडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. दरम्यान, पवार यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून केंद्रीय महिला व बालविकास मंत्र्यांशी चर्चा केली. आणि येत्या अधिवेशनात या विषयावर प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही या संदर्भातील निवेदन देण्यात आले होते. त्यांनीसुद्धा दखल घेत केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांना एक पत्र लिहून यथोचित कार्यवाही करण्यासाठी सुचविले आहे. निवेदन देताना शिष्टमंडळात ॲड. बाबासाहेब वासाडे यांच्यासह ॲड. अनिल वैरागडे, अविनाश गरपल्लीवार, सखाराम दिघे, पुरुषोत्तम मेंढूलकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here