अबब : पोलीस ठाण्यात तोडफोड करीत, गुंडाने घेतला ठाणेदारांच्या खुर्चीचा ताबा

0
364

यवतमाळ :

चोरी, घरफोडीसारखे गुन्हे शिरावर असलेला गुंड थेट पोलीस ठाण्यात तोडफोड करून ठाणेदारांच्या खुर्चीचा ताबा घेतो, या घटनेने स्थानिक पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. यावरून गुन्हेगारांमध्ये पोलिसांचे कोणतेही भय शिल्लक नसल्याचे स्पष्ट होते पोलीस दप्तरी हिस्ट्रीशीटर म्हणून नोंद असलेल्या अट्टल गुंडाने आज सायंकाळी यवतमाळ शहरात प्रचंड धुमाकूळ घातला.

वाईन शॉपमध्ये दारू व रोख रकमेची लुटालूट, बाजारपेठेत उभ्या कारची तोडफोड केली. त्यानंतर चक्क शहर पोलीस ठाण्यात जावून दोन संगणकांचे नुकसान करीत थेट ठाणेदारांच्या खुर्चीचा ताबा घेतला. या घटनेने व्यापाऱ्यांसह पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे.

चाँद झब्बू कालीवाले (३८) रा.तलावफैल परिसर यवतमाळ असे या गुंडाचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी धामणगाव रोडवरील कॉटन मार्केट चौक परिसरापासून त्याने तोडफोड व धुमाकूळ सुरू केला.

अतिमद्य प्राशन केलेल्या अवस्थेत होता. त्याने अप्सरा टॉकीज मार्गावरील एका दारू दुकानात गल्ल्यातील रकमेची लुटालूट केली. तेथून दारूचा बॉक्सही लुटला. यावेळी त्याच्याजवळ धारदार शस्त्रे होती. त्यानंतर तो बाजारपेठेतील टांगा चौकात पोहोचला. तेथे त्याने धुमाकूळ घातला. इंदिरा गांधी मार्केट परिसरात एका कारची तोडफोड केली. त्यानंतर तो थेट शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला. बहुतांश पोलीस कर्मचारी शिवजयंती बंदोबस्ताच्या निमित्ताने शहरात तैनात असल्याने पोलीस ठाण्यात फारसे मनुष्यबळ नव्हते. हीच संधी साधून तो सीसीटीएनएस प्रणाली असलेल्या कक्षात गेला. तेथे महिला कर्मचारी तैनात होती. तिच्याशी बोलत असतानाच त्याने दोन संगणक फोडल्याचे सांगितले जाते. त्यानंतर तो ठाणेदारांच्या कक्षात शिरला. ठाणेदार धनंजय सायरे रजेवर आहेत. गुंड शेख चाँद हा थेट ठाणेदारांच्या खुर्चीत बसला. त्यानंतर तो निघून गेला. त्याला पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले. गुंडाच्या या दहशतीमुळे व्यापाऱ्यांनी शहर पोलीस ठाणे गाठले. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल झालेला नव्हता. मात्र, पोलीस गुंड शेख चाँदची झाडाझडती घेत होते.

चोरी, घरफोडीसारखे गुन्हे शिरावर असलेला गुंड थेट पोलीस ठाण्यात तोडफोड करून ठाणेदारांच्या खुर्चीचा ताबा घेतो, या घटनेने स्थानिक पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. यावरून गुन्हेगारांमध्ये पोलिसांचे कोणतेही भय शिल्लक नसल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, प्रभारी ठाणेदार राम बाकडे यांनी आरोपी चाँदला ताब्यात घेतले असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here