चित्ररथांद्वारे कोरोनाविषयक जनजागृतीसाठी मोहीम

0
141

चंद्रपूर, दि. 10 मार्च : जिल्ह्यात कोरोनाविषयक प्रभावी जनजागृतीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या डिजिटल चित्ररथाला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी आज हिरवी झेंडी दाखविली.
जिल्ह्याच्या विविध भागात फिरणाऱ्या या चित्ररथामध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, कोरोना लसीकरण आदींच्या चित्रफिती प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या डिजिटल चित्ररथाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत जनजागृती व सुरक्षित कोविड लसीकरणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे यांच्या संकल्पनेतून या प्रचार अभियानाची सुरुवात झाली आहे. डिजिटल चित्ररथासोबत योजनांची माहिती देणारे प्रचार साहित्य देखील वितरित केले जाणार आहे. आज या अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी यांनी फित कापून केले.
समाज कल्याण विभागाच्या योजनांची चित्ररथाव्दारे प्रसिध्दी
कोरोना जनगाजगृती चित्ररथासोबतच आज समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या योजनांचा चित्ररथ देखील जिल्ह्यातील विविध गावांमध्ये प्रचार व प्रसिध्दीसाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आला.
समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती अनुसूचित जाती व नवबौध्द घटातील लोकांपर्यंत पोहचविणे हे या जनजागृती मोहिमेचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावांमध्ये चित्ररथाद्वारे ही मोहीम राबविण्यात येत आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, सोबत सामाजिक न्याय विभागाच्या विशेष अर्थसहाय्य योजना जसे-कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजना, रमाई घरकुल योजना तसेच इतर योजनांची माहिती जिल्ह्यातील ग्रामीण भागात देवून जनमाणसात विस्तृत जनजागृती करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here