काळाचा घात : लग्न सोहळयात नवरदेवाचा मृत्यू

0
49

नववधूला सासरी घेऊन जाण्यापूर्वीच नवरदेवाचा मृत्यू
⭕ ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव येथील घटना
⭕ सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील होता नवरदेव
चंद्रपूर (प्रतिनिधी): 16 एप्रिल 2021
लग्न म्हणजे सात जन्मांचं बंधन. सामाजिक चालीरीतीनुसार माणूस विवाह बंधनात बांधल्या जाऊन संसाररुपी गाडा चालवतो. कधीकधी पती-पत्नी दोघेही एकमेकांना अखेरच्या श्वासापर्यंत साथ देतात, तर कोणी मध्येच साथ सोडतात. अशीच एक अत्यंत दुर्दैवी घटना आवळगावात गुरुवारी घडली. लग्न लागले. वरातीचे जेवण झाले. नववधूला घेऊन नवरदेव वाहनात बसल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने दोन्ही कुटुंबासह वऱ्हाडीही हादरले. नाजूक अभिमन्यू पोहनकर असे मृत नवरदेवाचे नाव आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील नाजूक पोहनकर यांचा विवाह ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील दीपाली नामक युवतीशी गुरुवारी ठरला होता. नाजूक हे कोरोनामुळे शासकीय नियमांचे पालन करत मोजकेच वऱ्हाडी घेऊन लग्नासाठी आवळगावला वधुमंडपी पोहचले. सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास आनंदाच्या वातावरणात नाजूक व दीपालीचा विवाह सोहळा पार पडला.
दुपारी तीन वाजताच्या दरम्यान रितीरिवाजानुसार नवरदेव नाजूक वधूला स्वगावी नेण्यासाठी वधूसह मोटारीत बसला. अशातच अचानक नावदेवाची प्रकृती बिघडली. लगेच उपचारासाठी ब्रह्मपुरीला हलविण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरने त्यांना गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्याचा सल्ला दिला. ब्रह्मपुरी वरून आरमोरीला नेत असता रस्त्यातच नवरदेवाची प्राणज्योत मालवली. ही वार्ता एकताच सहजीवनाचे स्वप्न रंगवत असलेल्या दीपालीच्या स्वप्नांचा क्षणात चुराडा झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here