अदलाबदल मृतदेहाची ? : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेहाची अदलाबदल ?

0
201

तीन दिवस लोटूनही मृतदेह बेपताच
⭕शासकीय रुग्णालयाकडून समिती गठीत
चंद्रपूर (प्रतिनिधी): 24 एप्रिल 2021
यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मंगळवारी दाखल रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह तीन दिवसानंतरही त्यांच्या नातेवाईकास मिळालेला नाही. रोशन भीमराव ढोकणे (२५) रा. पिपळगाव काळे ता. नेर असे मृत युवकाचे नाव आहे. त्याचा मृतदेह मेडिकलमधून बेपत्ता असल्याने नातेवाईक हवालदिल झाले आहेत. पोलिसांनीही बुधवारी या घटनेची तक्रार घेण्याऐवजी आधी शोध घ्या नंतर बघू,असा सल्ला दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

रोशनला मंगळवारी सकाळी पोटदुखीच्या असह्य त्रासामुळे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दिवसभर फिवर ओपीडीत ठेवण्यात आल्यानंतर सायंकाळी वॉर्ड क्र.२५ मध्ये हलविण्यात आले. तेथे रात्री ८ वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. मृतदेहाची खातरजमा करून नातेवाईक गावी निघून गेले. दुसऱ्या दिवशी शवविच्छेदनगृहातून त्यांना मृतदेह मिळेल असे सांगण्यात आले. मात्र, तीन दिवसांपासून रोशनचे नातेवाईक त्याचा मृतदेह शोधत असून, तो अद्यापही सापडला नाही. या संदर्भात मेडिकल प्रशासनाला विचारणा केली असता सदर युवकाचा मृतदेह वॉर्डात होता व तो शवविच्छेदनगृहात पाठविण्यात आला असे सांगण्यात आले.
मात्र, प्रभारींनी अधिष्ठातांना चुकीची माहिती दिल्याचे स्पष्ट झाले. आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर संबंधित वॉर्ड इनचार्जवर प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
*मृतदेह अदलाबदल झाल्याची शक्यता*
==========
वैद्यकीय महाविद्यालयात दररोज सरासरी 25 ते 30
रुग्णांचा मृत्यू होत आहे. करोनाबाधितांचा मृतदेह नेताना रोशनचा मृतदेह चुकीने नेण्यात येऊन त्याच्यावर अंत्यसंस्कारही झाले असण्याची शक्यता आहे. येथील शवविच्छेदनगृहात एका मध्यमवयीन अनोळखी पुरुषाचा मृतदेह दोन दिवसांपासून ठेवलेला आहे. त्याची ओळख अद्यापही पटलेली नाही. त्यामुळे कुणीतरी चुकून रोशनचा मृतदेह घेऊन गेले आणि हा मृतदेह तसाच राहिला असण्याची शक्यता आहे. या मृतदेहाची ओळख पटवून त्याच्या नातेवाईकांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here