कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण  बनविणारे केंद्र ठरावे  – आ. किशोर जोरगेवार

117

 चंद्रपूर

        जिल्ह्यात  ग्रामीण भाग मोठा असून  शेतीवर उपजीविका  असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था बळकट करण्याची गरज आहे. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमीची शेतकऱ्याना आर्थिक रित्या सक्षम करण्यासाठी नियोजन करावे. शेतकरी हिताचे निर्णय घेत हि  कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्याना स्वयंपूर्ण बनविणारे केंद्र ठरावी असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन तेथील कामाचा आढावा घेतला. यावेळी सभापती दिनेश चोखारे, उपसभापती रंजीत डवरे, संचालक निरज बोंडे, गोविंद पोळे, अरविंद चवरे, प्रभाकर श्रीरामे आदींची उपस्थिती  होती.

      यावेळी शेतकरी भवन, सुलभ शौचालय आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.  कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेतकरी यांच्यातील संबंध नेहमी मधुर असले पाहिजे, नियतीच्या संकटाशी दोन हाथ करताना शेतकरी नेहमीच अडचणीत येत असतो अश्यात कृषी उत्पन्न बाजार समितीने त्याच्या पाठीशी खंबीर उभे राहीले पाहिजे, कृषी उत्पन्न बाजार समितीतही  अनेक प्रश्न प्रलंबित आहे. याचीही मला कल्पना आहे. असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

     भारत हा शेतीप्रधान देश असून भारताची अर्थ व्यवस्था शेतीमाल उत्पादनावर अवलंबून आहे. मात्र  मागील काही वर्षामध्ये अनियमित पाऊस व नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.  सहाजिकच याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला आहे. शेतकर्‍याने पिकविलेल्या शेतीमालाची विक्री शेतकऱ्याला स्वतःच्या इच्छेप्रमाणे करता यावी याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती करण्यात आली त्यामुळे मूळ उदिष्ठाला समजेल असे काम चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून व्हावे अशी आशा यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.