अमृत कलश योजनेच्या कामाला गती द्या – आमदार किशोर जोरगेवार  

152

चंद्रपुर

मागील पाच वर्षांपासून शहरात अमृत कलश योजनेचे काम सुरु आहे. मात्र ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरिकांची पाण्याची समस्या सुटलेली नाही. आता या योजनेच्या कामाला गति मिळाली असली तरी ती समाधानकारक नाही. त्यामुळे अमृत कलश योजनेचे काम आणखी गतिशील करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर महानगर पालिका प्रशासनाला दिल्या आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांनी  बैठक घेत अमृत कलश योजनेच्या कामाचा आढावा घेतला यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते, कार्यकारी अभियंता महेश बारई अभियंता विजय बोरीकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे भालधरे, विवेक कामन यांच्या सह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
शहरातील पाणी समस्या सोडविण्यात महानगर पालिकेला यश आलेले नाही. परिणामी दर उन्हाळ्यात शहरात पाणी टंचाई निर्माण होत असते. याचा मोठा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. अश्यात अमृत कलश योजना सुरु झाल्यावर पाणी समस्या सुटेल अशी नागरिकांची आशा आहे. मात्र या कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे हि योजना सक्रिय होण्यास  विलंब होत आहे. त्यामुळे नागरिकांची प्रतिक्षाही वाढत आहे. हि बाब लक्षात घेता या योजनेच्या कामाला आणखी गती देण्याची गरज असल्याचे या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले, संपूर्ण शहरात ५२७ किलोमीटर पर्यंत अमृत कलश योजनेचे जाळे पसरणार आहे. यापैकी ३६० किलोमीटर पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम डिसेंबर महिन्या पर्यंत करण्याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले तसेच  या योजने अंतर्गत ८० हजार घरांना पाईप लाईनची जोडणी करायची असून यातील ७ हजार जोडण्या झाल्या असल्याचे सांगण्यात आले. उर्वरित जोडणीची कामे जलद करा असे निर्देश यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिलेत. तुकूम येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या सुधारणेचे  काम ८० टक्के पूर्ण झाले असून ८ पाण्याच्या टाकीचे काम ९१ टक्के पूर्ण झाले आहे. असल्याची माहिती यावेळी अधिकार्यांनी दिली.