चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या – यंग चांदा ब्रिगेड

120

 

चंद्रपुर

दोन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे निर्माण झालेला रोष कायम असतानांस सात वर्षीय नातनिवर आजोबानेच बलात्कार केल्याची नात्याला काळिमा फासणारी घटना चंद्रपूर शहरातील भिवापूर वार्डात काल शनिवारी उघडकीस आली. सदर दोन्ही प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना पाठविण्यात आले आहे.

समाज भावनांना हादरविणाऱ्या दोन घटना चंद्रपुरात घडल्या आहे. काही दिवसांपूर्वी सावली तालुक्यातील पाथरी येथे दोन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी जितेंद्र मेश्राम या नराधम आरोपीस अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे समाजात रोष पसरला आहे. या घटने विरोधात पाथरी गाव बंद ठेवून घटनेचा निषेधही करण्यात आला होता. हि घटना ताजी असतानांस शहरातील भिवापूर वार्डात आजोबा – नातनिच्या नात्याला कलंकित करणारी घटना घडली आहे. सात वर्षीय नातीन घरी असताना उमेश शील या नराधम आजोबाने तिला टॉवर टेकडी जवळील घरी नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात चांगलाच रोष निर्माण झाला आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी आरोपी आजोबाला अटक केली आहे. सदर दोन्ही घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना पाठविले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, विमल काटकर, वैशाली रामटेके, स्मिता वैद्य, संगीता कार्लेकर, नीता नागोसे आदींची उपस्थिती होती.