ताडाळी येथे 33 हजार लोकसंख्येसाठी अॅन्टीजेन सुविधेचा शुभारंभ

0
110

 

चंद्रपूर, दि 28 जुलै :

चंद्रपुर

ग्रामीण भागातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता प्रत्येक प्राथमिक केंद्रांमध्ये स्वॅब चाचणी सुरू करण्याबाबतच्या धोरणातंर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी प्राथमिक केंद्रात आजपासून अँटीजन तपासणीला सुरुवात करण्यात आली. ताडाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीमध्ये राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज चाचणीचा शुभारंभ केला.

जवळपास 33 हजार लोकसंख्येला याचा लाभ मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आता ही सुविधा उपलब्ध केली जात आहे. चिचपल्ली, दुर्गापूर, घुगुस, या अन्य 3 ठिकाणी देखील चाचणी सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. कोरोना संसर्ग काळात अत्यंत आवश्यक बनलेल्या अॅन्टीजेन चाचणीच्या शुभारंभाच्या या कार्यक्रमाला या क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार देखील उपस्थित होते.

डॉ. माधुरी मेश्राम या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख असून याठिकाणी अमित जयस्वाल यांच्या नेतृत्वात अॅन्टीजेन चाचणी घेतली जाणार आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकसंख्येमध्ये आतापर्यंत 5 प्रतिबंधित क्षेत्र जारी करण्यात आले आहे. या भागात आत्तापर्यंत 18 कोरोना बाधित पुढे आले आहे. दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 27 कर्मचारी या ठिकाणी कार्यरत असून पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर, यांच्याशी यावेळी संवाद साधला. ग्रामीण भागातील जनतेसाठी कोरोना संसर्ग काळामध्ये देवदूत त्याच्या रूपात आपण आहात. त्यामुळे सामाजिक जाणीव ठेवून सर्व रुग्णांची सेवा करावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. या ठिकाणी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

ही सुविधा बहाल करण्याच्या विशेष कार्यक्रमांसाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत, उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाड, आरोग्य यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here