मूलनिवासी आदिवासींच्या रास्त मागण्यांना कायद्यांच्या कचाट्यात किचकट करू नका : ना.वडेट्टीवार

0
67

 

चंद्रपूर, दि. 3 ऑगस्ट :

वहिवाटीतून आणि रोजगाराच्या संधी म्हणून पूर्वापार चालू असलेल्या आदिवासींच्या न्याय्य हक्काचे रक्षण झाले पाहिजे. त्यांच्या रोजगारावर व अस्तित्वावर गदा येणार नाही अशा पद्धतीने कायद्याचा गैरवापर होता कामा नये, सिंदेवाही परिसरात आवश्यक उपाययोजना करून गुंते सोडवा. प्रकरण किचकट करू नका, अशा सुचना राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिल्यात.

ब्रह्मपुरी मतदारसंघातील सिंदेवाही तालुक्यातील पीपरपर्टी, कारवाँ, सिंगलझरी, पांढरवाडी, वासेरा आदी गावातील नागरिक व वनसंरक्षक प्रवीणकुमार, उपवनसंरक्षक गुरुप्रसाद यांच्यासोबत पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडली. यावेळी कोअर व बफर क्षेत्रातील नागरिक व त्यांचे वनांवरील अवलंबित्व, वनजमिनीवरची त्यांची वहिवाट, कायद्यातील तरतुदी, जिल्हा परिषदेच्या मालकीच्या तलावातील मासेमारी, वनविभागात प्रवेश करण्यासाठी द्यावयाच्या प्रवेशिका आणि आणि न्यायालय व वन कायद्यांच्या तरतुदी आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.

जिल्हा परिषदेचे सदस्य रमाकांत लोधे हे देखील यावेळी उपस्थित होते. या बैठकीमध्ये परिसरातील जनतेने दोन दिवसापूर्वी दिलेल्या निवेदनाची माहिती रमाकांत लोधे यांनी पालकमंत्र्यांपुढे सादर केली.

पालकमंत्र्यांनी कायद्याचा वापर योग्य पद्धतीने करताना या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या न्याय हक्कावर गदा तर येत नाही ना याचा विचार अधिकारी वर्गाने करावा, अशा सूचना यावेळी दिल्या. काही मुद्द्यांची कोंडी सोडवण्यासाठी वन मंत्र्यांसोबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

स्थानिक स्तरावर सहज सुटण्यायोग्य प्रश्नाला सामंजस्याने सोडविण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. जंगलामध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारी परवानगी, गाड्यांच्या वापराची परवानगी व स्थानिक स्तरावर सुटू शकणार या प्रश्नाला सुरुवातीला पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

नागरिकांनी यावेळी आपल्या समस्या मांडल्या. सर्व प्रकरणाला एकत्रित सोडविण्यासाठी वनमंत्री यांच्या मंत्रालयातील बैठकीनंतर पुन्हा एकदा अधिकारी व समस्याग्रस्त भागातील गावकऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. एकत्रित बसून सर्व प्रश्न सोडविण्यात येईल, असे आश्वासन यावेळी पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी गावकऱ्यांना दिले.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here