ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनचे वृक्ष लागवडीच्‍या क्षेत्रातील कार्य अभिनंदनीय व अनुकरणीय – आ. सुधीर मुनगंटीवार

0
110

चंद्रपुर
वृक्ष लागवड हे ईश्‍वरीय कार्य आहे. या भावनेतुन आ. प्रा. अनिल सोले यांनी सलग 5 वर्षे वृक्षदिंडी काढून जनजागृतीचे काम कार्य केले आहे. वृक्ष लागवड मोहीमेच्‍या प्रचार प्रसारासाठी व ही मोहीम युवकांपर्यंत, विद्यार्थी विद्यार्थीनींपर्यंत पोहचण्‍याच्‍या दृष्‍टीने विविध स्‍पर्धांचे आयोजन करून वृक्ष लागवडीचे महत्‍व त्‍यांनी जनमानसात रूजविले. चंद्रपूर जिल्‍हयात देवराव भोंगळे यांनी वृक्ष दिंडीची मोहीम राबविली. आ.प्रा. अनिल सोले, देवराव भोंगळे यांचे अभिनंदन करताना त्‍यांच्‍या पर्यावरणाप्रती असलेल्‍या सामाजिक जाणीवेचे व कृतीचे प्रत्‍येकाने अनुकरण करावे असे आवाहन माजी अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन या संस्‍थेच्‍या वतीने आयोजित ई-पुरस्‍कार वितरण सोहळयात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनचे आ. प्रा. अनिल सोले, आ. नागो गाणार, आ. रामदासजी आंबटकर मंचावर उपस्थित होते. जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष (ग्रामीण) देवराव भोंगळे, भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, राजेंद्र गांधी, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, भाजयुमो महानगर अध्‍यक्ष विशाल निंबाळकर, प्रकाश धारणे, सूरज पेदुलवार, प्रज्‍वलंत कडू, प्रशांत विघ्‍नेश्‍वर, आमीन शेख, धवल सावरे यांची यावेळी प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, वनमंत्री म्‍हणून काम करणयाची संधी मला मिळाली. राज्‍यातील वृक्षाच्‍छादन वाढावे व हरीत महाराष्‍ट्र ही संकल्‍पना साकार व्‍हावी यासाठी 50 कोटी वृक्ष लागवडीचा निर्धार आम्‍ही केला. राज्‍यातील जनतेचा, स्‍वयंसेवी संस्‍था, सामाजिक व धार्मीक संघटना, औद्योगिक क्षेत्र अशा सर्वच घटकांचा उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद या वृक्ष लागवड मोहीमेला लाभला. ही मोहीम एक लोक चळवळ म्‍हणून समोर आली. विक्रमाची नोंद झाली. विदर्भात या मोहीमेसाठी जनजागरण करण्‍याकरीता आ. प्रा. अनिल सोले यांनी ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनच्‍या माध्‍यमातुन जो पुढाकार घेतला तो निश्‍चीतच अनन्‍यसाधारण आहे. यात देवराव भोंगळे यांनीही त्‍यांना साथ दिली. चित्रकला स्‍पर्धा, निबंध स्‍पर्धा, सेल्‍फी विथ ट्री अशा स्‍पर्धांच्‍या माध्‍यमातुन घर बसल्‍या या मोहीमेबाबत जनजागरण केले. या कार्यक्रमाचे स्‍वरूप पुरस्‍कारापर्यंत मर्यादित न राहता मी या प्रक्रियेत माझे योगदान किती देवू शकेल याचा विचार होणे गरजेचे आहे, असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.

ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनचे आ. प्रा. अनिल सोले यांनी प्रास्‍ताविक केले. आ. मुनगंटीवार यांनी वनमंत्री असताना केलेली विक्रमी वृक्ष लागवड महाराष्‍ट्र कधिही विसरू शकणार नाही. या मोहीमेत आम्‍ही ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनच्‍या माध्‍यमातुन आपला खारीचा वाटा उचलण्‍याचा प्रयत्‍न केला व तो यशस्‍वी सुध्‍दा झाला याचा मला आनंद आहे. वृक्षदिंडीच्‍या माध्‍यमातुन जनजागृतीचे आम्‍ही सुरू केलेले काम असेच अविरत सुरू राहील असेही आ. सोले म्‍हणाले. यावेळी आ. रामदासजी आंबटकर, आ. नागो गाणार यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झालीत. कार्यक्रमाचे संचालन सुभाष कासनगोट्टूवार यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here