मुधोली : शेततळ्यात बुडून वहिनी व नंनदेचा दुर्दैवी अंत

103

 

भद्रावती.. अब्बास आजानी

शेतात फवारणी करून झाल्यानंतर हातपाय धुण्याकरिता शेततळ्यावर गेलेल्या वहिनी व नंनदेचा पाण्यात बुडून करून अंत होण्याची हृदयद्रावक घटना भद्रावती तालुक्यातील मुधोली या गावात दि.8 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता उघडीस आली.
मुधोली येथील शेतकरी यशवंत पुंजाराम गायकवाड यांचे शेत यशवंत चौधरी यांनी यंदा भाडे तत्वावर केले. या शेतात कापूस या पिकाची लागवड करण्यात आली. या पिकावर किटकनाशकांची फवारणी करण्याकरिता यशवंत चौधरी यांची इयत्ता नववीत शिकत असलेली मुलगी पौर्णिमा (16) व तिची चुलत वहिनी अनिशा रामभाऊ चौधरी ( 21) या दोन जणी दि.7 ऑगस्ट रोजी शेतात गेल्या. दरम्यान, दिवसभर फवारणी केल्यानंतर सायंकाळी 5 वाजेदरम्यान या दोघीही हातपाय धुण्याकरिता जवळच्याच शेततळ्यात गेल्या. त्यानंतर एकीचा पाय घसरून ती पाण्यात पडली. तिला वाचवायला दुसरी गेली असता तीही पाण्यात ओढल्या गेली.अशा प्रकारे दोघींचाही पाण्यात बुडून करूण अंत झाला.मात्र याबाबत कोणालाही काहीच माहीत नव्हते.बराच वेळ होऊनही अनिशा आणि पौर्णिमा घरी परतल्या नाही. म्हणून घरच्या मंडळीने शेतात जाऊन शोध घेतला.मात्र या दोघींचाही थांग पत्ता लागला नाही. शेवटी भद्रावती पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली.लगेच भद्रावती पोलीस मुधोलीकडे रवाना झाले.त्यांनी गावकऱ्यांसह शेत आणि जंगल परिसर रात्री 2 वाजेपर्यंत पिंजून काढला. मात्र त्या कुठेच आढळून आल्या नाही. मुधोली हे गाव ताडोबा जंगल परिसराला लागून आहे. त्यामुळे या गावाच्या परिसरात नेहमीच पट्टेदार वाघाची दहशत असते. कदाचित वाघाने हल्ला केला असावा म्हणून नेहमी वाघ येण्याच्या ठिकाणीही शोध घेण्यात आला.
विशेष म्हणजे सदर शेत तलावात जाळी टाकून त्यांचा शोध घेण्यात आला. परंतु जाळीत त्या सापडल्या नाहीत. सदर शेत तळ्यात 10 ते 15 फूट खोल डोह आहे. दरम्यान, आज दि.8 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता गावकरी त्या शेततळ्यावर गेले असता. त्यांना अनिशा चौधरी यांचा मृतदेह तरंगतांना दिसला.त्यानंतर एक तासाने पौर्णिमा चौधरी हिचा मृतदेह वर आला. या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन गावकऱ्यांच्या मदतीने दोन्ही प्रेत बाहेर काढले व घटनास्थळाचा पंचनामा केला. सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत. शवविच्छेदन झाल्यानंतर दोघीवरती अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
………..*म्हणून हळहळला संपूर्ण मुधोली परिसर*……..

मुधोली हे गाव भद्रावती शहरापासून 30 कि. मी. अंतरावर ताडोबा जंगलातील टेकड्यांच्या पायथ्याशी आहे. आजू बाजूच्या खेड्यांच्या तुलनेत हे गाव मोठे आहे. अनिशा चौधरी या महिलेचे नुकतेच दि 31 मे रोजी लग्न झाले होते. यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील मांडवा हे तिचे माहेर आहे.भावी जीवनाची सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या अनिशावर काळाने झडप घातल्याने अवघ्या सव्वा दोन महिण्यात अर्ध्यावरती डाव मोडण्याची वेळ आली. तर पौर्णिमा चौधरी ही मुधोलीच्याच सरस्वती विद्यालयात इयत्ता नववीत शिकत होती. सध्या टाळेबंदी असल्याने शाळा बंद आहेत. त्यामुळे ती घरच्या लोकांना एक मदत म्हणून शेतात फवारणी करायला गेली होती. एकाच चौधरी परिवारातील दोन सदस्य अगदी कमी वयात जगाला सोडून गेल्याने संपूर्ण मुधोली परिसर हळहळले आहे.