भाजपा पदाधिकाऱ्याने केले कोरोना पळवण्यासाठी चक्क मंदिरात हवन

136

चंद्रपूर :

देशाचे पंतप्रधान कोरोना पासून रक्षणासाठी सातत्याने विज्ञानवादी वक्तव्य करून देशातील जनतेला कोरोना विरोधात लढा देण्याचे आवाहन करीत आहे. तर दुसरीकडे देशभरातील भाजप नेते कोरोनाला घेऊन अकलेचे तारे तोडताना दिसत आहे. अशीच एक घटना चंद्रपूर जिल्ह्यात समोर आली आहे.

*डोंगरे महाशयांनी कोरोनाला थेट दुसऱ्या देशात जाण्याचा दिला सल्ला 

अनिल डोंगरे नामक भाजपच्या पदाधिकाऱ्याने कोरोना दूर व्हावा यासाठी चक्क मंदीरात जाऊन हवन केले. त्याचे व्हिडिओ आणि फोटो समाजध्यमात टाकले. त्यात लहान मुलेदेखील दिसत आहेत. याबाबत एका व्यक्तीने आक्षेप घेतला असता डोंगरे महाशयांनी त्याला थेट दुसऱ्या देशात जाण्याचा सल्ला दिला
जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचे प्रकोप वाढत आहे यासोबतच रुग्ण आणि त्यांचा मृत्यूचा आकडा चिंताजनकरित्या वाढत आहे.असे असतांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मात्र याचे काहीच देणेघेणे नाही असे दिसून येत आहे.

कोरोनापासून यांना नैसर्गिक संरक्षण मिळाले की काय याच अविर्भावात ते वावरताना दिसत आहेत. असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. अनिल डोंगरे नामक भाजपच्या पदाधिकाऱ्याने कोरोना दूर व्हावा यासाठी चक्क मंदीरात जाऊन हवन केले. यादरम्यान कोरोनाचे सर्व नियम त्या हवनात ‘भस्मसात’ करण्यात आले. श्रद्धेच्या नावाने असले प्रकार करणाऱ्यांना परमेश्वराने सर्वात आधी सद्बुद्धी द्यायला हवी, यामुळे त्यांच्यासह अनेकांचा जीव निरर्थक धोक्यात जाणार नाही.
सामान्य नागरिकांना आपल्या कृतीतून कोरोनाचे नियम पाळण्यास प्रवृत्त करणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. मात्र, भाजप पदाधिकाऱ्यांनी या कोरोनाला आव्हान देण्याचा मोर्चाच उघडला की काय, असे चित्र त्यांच्या कृतीतून दिसत आहे. म्हणूनच कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडविण्याचे किस्से काही केल्या संपत नाही आहेत.

विशेष म्हणजे असे करताना भाजपचे काही पदाधिकारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण सुद्धा झाली आहे. मात्र तरीही यातून धडा घेण्याऐवजी ते या नियमांना पायदळी तुडविण्यातच धन्यता मानत आहेत. यामध्ये जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, उपमहापौर राहुल पावडे, ब्रिजभुषण पाझारे यांचा समावेश आहे.बल्लारपूर येथील एक जबाबदार पदाधिकारी अशाच एका कार्यक्रमामुळे कोरोनाबाधित झाला तर भाजपच्या एका जिल्हास्तरीय नेत्याच्या कुटुंबातील सदस्यदेखील कोरोना पॉझिटिव्ह निघाले. अशा अतिउत्साही कृतीत आता आणखी एका भाजप पदाधिकाऱ्याची भर पडली.

अनिल डोंगरे यांनी विचोडा गावातील हनुमान मंदिरात आपल्या कार्यकर्त्यांसह होम हवन केले. यात ना कुणी मास्क घातले ना कुणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले. मात्र, कोरोनाचे संकट दूर पळावे यासाठी चक्क हवन केले. त्याचे व्हिडिओ आणि फोटो समाजध्यमात टाकले. त्यात लहान मुलेदेखील दिसत आहेत. हा प्रकार अत्यंत संतापजनक तर आहेच सोबत अनेक जणांचे नाहक जीव धोक्यात टाकणारा आहे. याबाबत एक व्यक्तीने आक्षेप घेतला असता डोंगरे महाशयांनी त्याला थेट दुसऱ्या देशात जाण्याचा सल्ला दिला.

खरं तर पूजा, होम-हवन हा ज्याच्या त्याच्या आस्थेचा विषय आहे. मात्र, असे करताना लोकप्रतिनिधींनी त्याचे नियम पाळणे आवश्यक आहे. केवळ चमकोगिरी करण्यासाठी असे प्रकार करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो. तसेच असे करून सदर व्यक्ती स्वतःसह इतरांचा जीव तर धोक्यात घालत आहेतच सोबत सोशल मीडियावर अशा गोष्टी टाकून इतरांना देखील प्रोत्साहित करीत आहेत.

देशातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आतातरी असले प्रकार थांबायला हवे. अन्यथा भविष्यात काही अनुचित प्रकार घडला तर त्याची किंमत सगळ्यांनाच चुकवावी लागेल.