भद्रावती पोलिसांनी बिबट्याला लावले पळवून, ‘तू शेर , तो हम सव्वाशेर ’

0
77

बिबट्याला लावले पळवून, मोठा अनर्थ टळला
भद्रावती : शेर म्हटले की, मोठमोठ्या धाडसी लोकांची पाचावर धारण बसते.शेर हा शब्द कानी पडताच कोणालाही न घाबरणारा प्राणी म्हणजेच ‘वाघ’ डोळ्यासमोर येतो. तसेच पोलीस हा घटक म्हणजे गुन्हेगाराला धाक असणारा घटक असतो. आजही अनेक सभ्य माणसांची पोलीस स्टेशनच्या आवारात जाण्याची हिम्मत होत नाही. मात्र पोलीस स्टेशनच्या मुख्य प्रवेशव्दारात ‘मै शेर हु’ म्हणत येण्याची हिम्मत करणाऱ्या बिबटाला ‘तू शेर है, तो हम सव्वाशेर है’ असे म्हणत पोलिसांनी त्याला पळवून लावल्याची घटना दि.4 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहिती नुसार, दि.4 सप्टेंबरच्या रात्री 9 वाजता एक बिबट आयुध निर्माणीच्या जंगलातून संरक्षण भिंत ओलांडून भद्रावती पोलीस स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारात आला. तो पोलीस स्टेशनच्या परिसरातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतून आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस स्टेशनच्या आवारात हजेरी चालू होती. बिबट प्रवेशद्वारात दिसताच पोलिसांनी आरडा ओरड केली आणि त्याला तेथून पळवून लावले.पोलीस मागे धावताच बिबट्याने धूम ठोकली आणि तो बाजूच्या झुडुपात लपला.
विशेष म्हणजे बिबट्याच्या प्रवेशद्वारातील आगमनाच्या एक मिनिटापूर्वी एक महिला पोलीस अधिकारी आपल्या दीड ते दोन वर्षांच्या मुलासोबत बिबट येण्याच्या ठिकाणावरून फिरून गेल्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.दरम्यान, पोलिसांनी लगेच परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. मागील दोन-तीन महिन्यापासून पोलीस स्टेशन ,तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, कटारिया लेआऊट ,मल्हारीबाबा सोसायटी, पॉवरग्रीड ,चेक पोस्ट ,तिरुपती बालाजी मंदिर, गौतम नगर या परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून सायंकाळी 7 वाजताच्या नंतर या परिसरात फिरणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर पिंजरे लावून या बिबट्यांना जेरबंद करणे आवश्यक झाले आहे. अन्यथा एखादा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here