अनुसूचित जमातीसाठी खावटी अनुदान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

0
94

चंद्रपूर दि. 14 सप्टेंबर:   राज्यात उद्भवलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना सहाय्य करण्यासाठी  खावटी अनुदान योजना सन 2020-21 या एक वर्षासाठी सुरू करण्यास व या योजनेचा लाभ 50 टक्के रोख व 50 टक्के वस्तू अनुदान स्वरूपात देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

खावटी अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी अर्ज प्राप्त करण्यासाठी  आश्रम शाळा, अनुदानित आश्रम शाळा, शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वस्तीगृह येथुन विनामूल्य अर्ज प्राप्त करुन घ्यावे.

चिमूर प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिमूर, वरोरा, भद्रावती, नागभीड, ब्रह्मपुरी या पाच तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना खावटी अनुदान योजनेची अंमलबजावणी  करण्यात येणार आहे.

या कुटुंबांना घेता येणार लाभ

अनुसूचित जमाती मधील कुटुंबामध्ये प्रामुख्याने पारधी जमात, आदिम जमात, मनरेगा वर काम करणारी कुटुंबे, परितक्त्या, घटस्फोटीत महिला, विधवा, भूमिहीन शेतमजूर, अपंग व्यक्ती असलेले कुटुंब, अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब इत्यादी कुटुंबांना सदर योजनेचा लाभ घेता येईल.

ही योजना 100 टक्के अनुदानावर असल्याने लाभार्थ्यांनी कोणत्याही स्तरावर कुणाशीही आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास  प्रकल्प अधिकारी के.ई. बावणकर यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here