शेतकऱ्यावर संकट : कृषी पंपाचा वीज पुरवठा केला बंद

0
94

ब्रम्हपुरी (चंद्रपूर) :

वैनगंगा नदीला आलेल्या महापुरात हजारो हेक्टर शेती नष्ट झाली. उभे असलेले धान पीक नाहीसे झाले. भाजीपाला, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुराच्या पाण्याने शेती गेली जे वाचलं ते वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र, वाचलेल्या धान पिकासाठी पुन्हा पाण्याची गरज आहे. अशातच पूर्ववत झालेल्या कृषी पंपाचा वीज पुरवठा महावितरण विद्युत विभागाने बंद केला असल्याने शेतकरी पुन्हा सुलतानी व अस्मानी संकटात सापडला आहे.
पुरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक गावे बुडाली, घरे पडली, जीवनावश्यक साहित्य वाहून गेले, गुरेढोरे वाहून गेले, शाळा-महाविद्यालयांमध्ये पाणी शिरले तसेच शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाचलेले धान पीक जगविण्यासाठी पुन्हा पाण्याची आवश्यकता आहे. विविध ठिकाणी विद्युत पोल पडले त्यामुळे विद्युत पुरवठा अनेक ठिकाणी खंडित असल्याने धान पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागत आहे. पूर ओसरल्यानंतर विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला. मात्र, कृषी पंपाचा वीज पुरवठा गांगलवाडी येथून बंद केला असल्यामुळे विद्युत अभावी धान पिकांना पाणी होत नसल्याने वाचलेले धानपीक पुन्हा हातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावू लागलेली आहे.
पुराच्या पाण्याने वाहून गेलेले पंप, पाईप, शेती आदींचा सर्वे करण्यात येत आहे. शासकीय धोरणानुसार नुकसान भरपाई मिळणार आहे. पुरातून काही शेतकऱ्यांची थोडीफार शेती वाचली. या शेतीला जगविण्यासाठी पाण्याची गरज आहे. परंतु मोटार पंप पाण्याने खराब झाल्याने दुरस्तीचा साधारणतः पाच हजार रुपयांचा खर्च शेतकऱ्याला करावयाचा आहे.
पंप दुरुस्ती करून तसे लेखी स्वरूपात विद्युत विभागाला अर्ज भरून माहिती द्यायची आहे. तेव्हाच विद्युत पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे गांगलवडी येथील अभियंता रंगारी यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. एखादी पंप नादुरुस्त असल्यास शॉक लागून अशी घटना घडू नये म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी मोटार पंप सुरळीत करणे गरजेचे असल्याचे रंगारी यांनी सांगितले.
अनेक शेतातील विद्युत खांब तुटून पडले आहेत. तेथील विजेच्या तारा देखील शेतात पडले आहेत. त्यामुळे शेतात नवे खांब पोहचविता येत नाही. या शेतातील पुरवठा सुरू करता येत नाही. अशा शेतकऱ्यांनी तसे अर्ज संबंधित विभागाकडे द्यावेत. अशा शेतांचासुध्छा सर्वे करण्यात येत आहे. वीना विद्युत पुरवठा व विना पाण्याने नुकसान होणाऱ्या शेतीचेही पूर्ण सर्वे करण्यात येत आहेत. त्यांनाही उचित मोबदला शासनाकडून देण्यात येणार असल्याची माहिती तालुका काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष प्रभाकर सेलोकर यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here