आरोग्यसेवेचे बाजारीकरण थांबवा : नरेश पुगलिया

282

 

चंद्रपूर : खासगी आणि शासकीय रुग्णसेवा कोलमडली आहे . खाटांसाठी रुग्णांची धावपळ सुरू आहे . एन्टीजन किटस्चा तुटवडा आहे . स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांनी सातशे खाटांच्या कोविड सेंटरची घोषणा केली होती . त्याची अमलबजावणी झाली नाही . वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन संलग्नित शंभर खाटा तयार आहे . डॉक्टर , परिचारिकांचा तुटवडा आहे . त्यांना विशेष भत्ते दिल्याशिवाय उपलब्ध होणार नाही . हे माहित असतानाही पालकमंत्री गंभीर नाही , असा आरोप माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केला . यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्रही पाठविले आहे . वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतले आहे . त्यानंतर खाटांची संख्या वाढविण्यास उशीर होत आहे . खनिज विकास निधीचे शेकडो कोटी जिल्ह्यात उपलब्ध आहे . ते आरोग्य सेवेवर खर्च करण्याची परवानगी आहे . खासगी रुग्णालयात कोरोना संकटात दुप्पट , तिप्पट वेतन दिले जात आहे . तर शासकीय रुग्णालयात तो का दिला जात नाही ? खासगी जम्बो कोविड सेंटर नागपूरच्या एक व्यापाऱ्याच्या मदतीने चंद्रपुरात १५ दिवसांत उभे केले जाते . रामनगर येथील शासकीय महिला स्णालयात ३०० बेडची व्यवस्था असताना डॉक्टर्स व परिचारिका नाही . या कारणास्तव ते सुरू करण्यास विलंब केला जात आहे . त्यामुळे सामान्य जनतेचा उद्रेक होईल . त्यांच्यासाठी शासकीय रुग्णालय हाच एक पर्याय उपलब्ध असतो . आरोग्य सेवेचे बाजारीकरण होऊ देऊ नका , अशी विनंती त्यांनी टोपे यांना केली .