नवीन अधिष्ठाता डॉ हुमणे यांना ‘पदभार’ देण्यास डाॅ. मोरे यांची टाळाटाळ डाॅ हुमणे यांची गोंदियाला बदली होण्याची शक्यता जन विकास सेना आक्रमक भूमिका घेणार

0
146

चंद्रपूर

डॉ.अरूण हुमणे यांची चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नवीन अधिष्ठाता म्हणून नियुक्ती झाल्याचे पत्र धडकले. सहाजिकच प्रसिद्धी माध्यमांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोरे यांच्या बदलीची चर्चा सुद्धा रंगली. तसेच डॉक्टर हुमणे यांनी पदभार घेतल्याची माहिती सुद्धा समोर आली.परंतु प्रत्यक्षात नेहमीप्रमाणे डॉ. एस.एस.मोरे ही बदली रद्द करण्याच्या प्रयत्नात असल्याचे माहितीस आलेले आहे. कालपासून डॉ. हुमणे ‘पदभार’ घेण्यासाठी वाट पाहत आहेत. मात्र काल दुपारी 2 वाजतापासून डॉ. मोरे ‘पदभार’ देण्यासाठी उपलब्ध झालेले नाहीत. ही बाब स्वाभाविकपणे घडलेली नाही. जिल्ह्यातील झारीचे शुक्राचार्य असलेले काही नेते डॉ. मोरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत असल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळाले. सोबतच वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांचे आंधळे प्रेम व चंद्रपूरच्या रुग्णालयाचे अधीक्षक बनण्याच्या प्रतिक्षेत असलेले सामाजिक-राजकीय घरातील एका डॉक्टरचा पाठिंबा अशी वरून खालपर्यंत साखळी निर्माण करण्यात डॉ. मोरे यांना यश आलेले आहे.
वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची ऐशी-तैशी झालेली असुन जिल्ह्यातील रुग्णांना या गोष्टीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.मात्र जिल्ह्यातील रुग्णांच्या समस्यांपेक्षा डॉ. मोरे यांच्यावरच वरील ‘अर्थ’पूर्ण प्रेम नेहमी वजनदार ठरले.त्यामुळे त्यांना पाच वर्षे चंद्रपुर वैद्यकीय महाविद्यालयात सेवा देण्याची संधी मिळाली.नंदुरबार येथे मागील महिन्यात त्यांना डेप्युटेशनवर पाठवण्यात आले होते.परंतु आठ दिवसातच त्यांना चंद्रपूरला परत बोलवण्यात आले.लोकप्रतिनिधी- सामान्य नागरिक सर्व स्तरातून अधिष्ठाता डॉ. मोरे यांच्या बदलीची मागणी होत असताना त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्यात जिल्ह्यातील नेत्यांना कोणता रस आहे, नेत्यांच्या या कृतीमागे कोणता ‘अर्थ’ आहे हा सवाल ‘जन विकास सेनेचे’ अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी उपस्थित केलेला आहे. डॉक्टर हुमणे यांची गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयाला बदली करून डॉ. मोरे यांना चंद्रपूरला कायम ठेवण्याचा अखेरचा प्रयत्न पुन्हा एकदा सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळालेली आहे.ही गोष्ट संतापजनक आहे.डॉ.हुमणे यांना तातडीने पदभार न दिल्यास किंवा डाॅ.मोरे यांना चंद्रपूरमध्ये कायम ठेवल्यास आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेऊ असा इशारा सुद्धा पप्पू देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here