“माझे कुटुंब, माझी जबाबदारी” : आशा वर्करला शिविगाळ, गावात तणावाचे वातावरण

0
454

भद्रावती (चंद्रपूर) :

कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेला भद्रावती तालुक्यातील चेक बरांज या गावात तीव्र विरोध करण्यात आला असून आशा वर्करला शिविगाळ करण्याची घटना दि.26 सप्टेंबर रोजी सकाळी 11वाजता च्या सुमारास घडली.

कोविड-19 चा मुकाबला करण्याकरीता शासन युद्धस्तरावर प्रयत्न करीत आहे.त्याचाच एक भाग म्हणून शासनाने ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरु केली.चंद्रपूर जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते नुकताच झाला.भद्रावती तालुक्यात दि.26 सप्टेंबरपासून या मोहिमेला प्रारंभ झाला.या मोहिमेत आशा वर्कर,अंगणवाडी सेविका आणि त्याच गावातील शिक्षक यांचे एक पथक असते. हे पथक प्रत्येक कुटुंबाकडे जाऊन कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे तापमान,आॅक्सिजन,सर्दी,खोकला यांची नोंद करते.
दरम्यान, दि.26 सप्टेंबर रोजी चेकबरांज गावात सदर मोहिमेअंतर्गत सर्व्हे करण्याकरीता गावातील दोन शिक्षिका आणि मदतीला ग्रा.पं.चा शिपाई यांचे पथक गेले असता दोन-तीन घरी चांगले सहकार्य मिळाले. त्यानंतर मात्र इतर घरी जाताना सर्व ग्रामस्थांच्या रोषाला या पथकाला सामोरे जावे लागले. अफवांवर असलेला विश्वास आणि गैरसमज यामुळे ग्रामस्थांनी या पथकाला कडाडून विरोध केला व सर्व्हे करु दिला नाही.याबाबत तहसीलदार महेश शितोळे आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डाॅ.मंगेश आरेवार यांना कळविण्यात आले.लगेच दोन्ही अधिकारी चेकबरांज येथे दाखल झाले.त्यांनी ग्रामस्थांना खुप समजाविण्याचा प्रयत्न केला.परंतू ते अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.शेवटी हतबल होऊन दोन्ही अधिकारी माघारी परतले.सर्व ग्रामस्थ एकत्र आल्यामुळे एकच गोंधळ उडाला.त्यामुळे बराच काळ तणावाचे वातावरण होते.गावातील आशा वर्कर निशा मेश्राम यांच्यावर ग्रामस्थांचा जास्त रोष होता.गावात सर्व्हेसाठी पथक येणार हे आम्हास का सांगितले नाही ? असा त्यांचा सवाल होता.त्यामुळे मेश्राम यांना शिविगाळ करण्यात आली.
दरम्यान,यासंदर्भात गटविकास अधिकारी डाॅ.आरेवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,ग्रामस्थांमध्ये खुप गैरसमज पसरलेला आहे. त्यामुळे हा प्रकार घडला. त्यामुळे आम्ही या गावातील सर्व्हे थांबविलेला आहे.गावक-यांमधील गैरसमज लवकरच दुर करु आणि लगेच सर्व्हे सुरु करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here