पैश्यांसाठी हपापले सुशिक्षित डॉक्टर कुटुंब : डॉ. पतीकडून हुंड्यासाठी डॉ. पत्नीचा छेळ

0
331

अवैध प्रॅक्टिस साठीपण दबाव, पैश्यांसाठी हपापले सुशिक्षित कुटुंब

चंद्रपूर : वर – वधू दोघेही एमबीबीएस डॉक्टर असल्याने मुलीच्या पुढील शिक्षणासाठी दहा लाख रुपये वधुपित्याकडून वरपक्षाने उकळले. त्यानंतरही दवाखाना थाटण्यासाठी माहेरहून आणखी पैसे आण आणि नोंदणीकृत नसलेल्या दवाखान्यात अवैध प्रॅक्टिस कर म्हणून डॉक्टर पती व सासरच्यांनी दबाव आणल्याची तक्रार डॉक्टर पत्नीने केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल झाल्याने वैद्यकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे. डॉ अमोल केशव पेशट्टीवार (वय ३५) रा. जोशी वार्ड अहेरी आहे. त्याचा बाजारवाडी अहेरी येथे दवाखाना आहे.
डॉ. अमोल पेशट्टीवार मूळचा पेठ वार्ड ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर येथील रहिवासी असून २०१५ साली त्याचा विवाह यवतमाळच्या डॉ. किशोर मेक्रतवार यांच्या स्नेहल या डॉक्टर कन्येशी झाला. लग्नावेळी पेशट्टीवार कुटुंबीयांनी सुनेच्या डिजिओ पदवी शिक्षणासाठी १० लाख रुपयांची मागणी केल्याने वधुपित्याने डॉ. अमोल च्या बँक खात्यात सदर रक्कम वळती केली. लग्नानंतर डॉ. स्नेहल यांनी डिजिओ पदवी प्राप्त केली आणि हे डॉक्टर दाम्पत्य २०१७ ला अहेरी जि. गडचिरोली येथे स्थायिक झाले. आपल्या पदवी शिक्षणासाठी दहा लाख रुपये खर्च आला नाही त्यामुळे वडिलांना पैसे परत द्या अशी मागणी पत्नीने केली परंतु डॉक्टर पती पैसे परत देण्यास तयार झाला नाही.
या कालावधीत अहेरीत डॉ. अमोल पेशट्टीवार याने दवाखाना उभारला. या दवाखान्याचे रजिस्ट्रेशन नसल्याने, रजिस्ट्रेशन करावे अशी विनंती डॉक्टर पत्नीने केली. मात्र रजिस्ट्रेशन नसलेल्या दवाखान्यात रुग्णांवर अवैध उपचार करण्यास देखील आपल्याला पती डॉ. अमोल पेशट्टीवार याने भाग पाडले त्यामुळेही डॉक्टर दाम्पत्यात वाद झाले, असे तक्रारीत नमूद आहे.

अहेरीला स्थायिक झाल्यानंतर घरी येणारे सासरे केशव पेशट्टीवार हे वेळोवेळी माहेरहून पैसे आणण्याच्या मागणीवरून शिवीगाळ करीत असल्याची तक्रार यापूर्वी देखील २० जानेवारी २०२० ला सुनेने अहेरी पोलीस ठाण्यात केली आहे. पती, सासरे, सासू, दीर व जाऊ वारंवार हुंड्यासाठी छळतात, मारहाण करतात, अपमानास्पद मानसिक त्रास देतात त्यामुळे जीवित्वास धोका असल्याची तक्रार सून डॉ स्नेहल पेशट्टीवार यांनी पोलिसांत दाखल केल्यानंतर अहेरी पोलीस ठाण्यात आरोपी पती डॉ अमोल पेशट्टीवार, सासरे केशव पेशट्टीवार, सासू कुसुम, दीर विशाल आणि जाऊ चैताली यांच्याविरुद्ध भादंवि चे कलम ४९८ अ, ४०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा नोंदविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here