प्रलंबित विकास कामे तात्काळ मार्गी लावा: ना. वडेट्टीवार विविध विकास कामांचा घेतला आढावा

0
111

 

चंद्रपूर दि.5 ऑक्टोबर:

ब्रह्मपुरी, सावली व सिंदेवाही क्षेत्रातील विकासकामांचा मोठा अनुशेष बाकी आहे. सदर प्रलंबित विकासकामांचा आराखडा तयार करावा व प्रस्ताव सादर करुन प्रलंबित विकास कामे तात्काळ मार्गी लावा, असे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला दिलेत. जिल्ह्यातील विकासकामांबाबत आढावा घेताना ते बोलत होते. ग्रामीण व तालुका स्तरावर आढावा घेत विविध समस्या जाणून घेतल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडलेल्या या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी सुरू असलेल्या कामावर अधिकाऱ्यांनी जाऊन निरीक्षण करावे तसेच कामे पूर्ण किंवा अपूर्ण याबाबतचा स्पष्ट अहवाल तयार करावा. अपूर्ण असलेली कामे किती दिवसांत पूर्ण करण्यात येतील याबाबतची माहिती सादर करावी, अशा विविध सूचना श्री. वडेट्टीवार यांनी यावेळी केल्या.

यावेळी ब्रह्मपुरी, सावली व सिंदेवाही तालुक्यातील उद्यान सुशोभीकरण, पुतळा सौंदर्यीकरण, अभ्यासिका, स्विमिंग पूल इत्यादी सारख्या विविध कामांचा समावेश असून या बांधकामासंदर्भात आराखडा व प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना नगरविकास विभागाला दिल्यात.

सावली तालुक्यातील पाथरी तलाव व शेलदार तलाव या तलावाच्या तसेच जलसंधारणाच्या कामाचे दुरुस्ती प्रस्ताव सादर करावेत व सदर काम विहित वेळेत पूर्ण करून घ्यावे जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळणे सोयीस्कर होईल असेही श्री. वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

सिंदेवाही तालुक्यात 1 हेक्टर जागेवर ग्रामीण हॉस्पिटल उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले. त्यासोबतच आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहाचे कामाबाबत प्रस्ताव त्यासोबतच एकत्रित नियोजनाचा आराखडा तयार करून विकासकामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही केल्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here