रेती तस्करांची शिरजोरी : घाट लिलाव होण्याआधीच रेती चोरण्यासाठी रस्त्यांची निर्मिती ? रस्ता तयार करण्यासाठी जेसीबी तैनात!, तहसीलदार निलेश खटके यांचे दुर्लक्ष!

554

 

पोंभुर्णा/ प्रतिनिधी

पोंभुर्णा तालुक्यात रेती तस्करांचे जाळे निर्माण झाले असून, ही साखळी तालुक्यातील विविध घाटातून रीती चोरत असून मोहाळयानंतर आता जुनगाव कडे त्यांनी मोर्चा वळवला आहे.
जुनगाव या गावच्या सभोवताल वैनगंगा नदीने वेढा दिला असून या नदीपात्रातील रेती ही उच्च दर्जाची व चांगली मानल्या जाते. तालुक्यात एकाही घाटाचा अद्याप लिलाव झालेला नसल्यामुळे रेती माफियांची चांगलीच गोची झालेली असली तरी वेगवेगळे मार्ग अवलंबून रेती तस्कर मोठ्याप्रमाणात रेतीची चोरटी वाहतूक व साठवणूक करीत आहेत.
नदीला आलेल्या यावर्षीच्या महापुरामुळे नदीकाठील शेत पीक भुईसपाट झाले आहे. याचा फायदा रेती माफिया घेत असून नदीमध्ये उतरण्याकरिता शेती पार करून जावे लागते. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याला काही पैशाचे आमिष दाखवून शेतातून मार्ग व घाट तयार करण्याचे काम येथे सुरू आहे. यापूर्वी बोरघाट येथून मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक करण्यात आली होती. परंतु बोरघाट कडे जाणाऱ्या रस्त्यावर महसूल विभागाने खंदक खोदलेला असल्यामुळे तिकडला मोर्चा आता दुसरीकडेच वळवलेला आहे.
या सर्व बाबी जुनगाव येथील माजी सरपंच तथा शिवसेना तालुका उपप्रमुख श्री. जीवनदास गेडाम यांनी तहसीलदार डॉक्टर निलेश खटके यांना अवगत केल्यानंतरही तहसीलदार कारवाई करण्यास का घाबरतात याचे नवल वाटते.
या रेती माफिया (तस्करी) मध्ये नेतेमंडळींचा जास्त भरणा असल्यामुळे तहसीलदार महोदय कारवाई करण्यास घाबरतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे.
मागील वर्षी एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची रेती भरलेला ट्रॅक्टर, गाडी कोणाची आहे आहे हे समजल्यानंतर त्यांनी ती गाडी सोडायला भाग पाडले. मात्र काही गरीब लोक आपले घरकुल बांधकामाकरिता किंवा खाजगी बांधकामासाठी छोट्या लोकांकडून रेती वाहतूक केली व ही माहिती तहसीलदार महोदयांना मिळाली की लगेच त्या गरीब ट्रॅक्टर मालकावर कारवाई करण्यास मागेपुढे पहात नाही. व रात्रंदिवस बडे रेतीचोर शासनाचा करोडो रुपया घशात घालत असताना, शासनाची जबाबदारी सांभाळणारे तहसीलदार मात्र मूग गिळून बसतात.
जुनगाव येथील शेतकरी चंदनखेडे यांच्या शेतातून रस्ता नदीमध्ये जात असल्यामुळे त्या शेतकऱ्याला 35 ते 40 हजार रुपये देऊन परवानगी घेतल्याची माहिती मिळाली आहे. अर्थात हा दरवर्षीचाच कार्यक्रम आहे.
परंतु यावर्षी जेसीबी आणल्यामुळे मोठ्या प्रमाणात रेती चोरी होणार अशी शंका उपस्थित केली जात आहे.मात्र यावर्षी या गावातील नागरिकांनी बाहेरच्या रेती चोरांना रेतीचा एकही कण चोरू देणार नाही, अशी भूमिका घेतली असल्यामुळे रेती माफियांचेही धाबे दणाणले आहेत.
तहसीलदारांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करुन कारवाई केली नाही तर शिवसेनेच्यावतीने या रेती चोरांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याची भूमिका शिवसेना तालुका उपप्रमुख जीवनदास गेडाम यांनी घेतली आहे.
घाट निर्माण करणारे चार रेती माफिया मिळून हा व्यवसाय करणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून तहसीलदार जर या बाबीकडे दुर्लक्ष करीत असतील तर याची तक्रार माननीय जिल्हाधिकारी यांचेकडे करण्यात येईल अशीही माहिती जीवनदास गेडाम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केली आहे.