सीसीआय अंतर्गत आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ

202

कोरपना :

सीसीआय अंतर्गत कापूस खरेदीला सुरुवात झाली असून सोनुर्ली येथील कापूस केंद्रावर मंगळवारी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. प्रथम कापूस विक्रीचा बहुमान सोनुर्ली येथील मधुकर मंदे या शेतकऱ्याला मिळाला आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे कापूस खरेदीला विलंब झाल्याने गतवर्षी कापसाची खरेदी करण्यामध्ये फार मोठी गैरसोय झाली होती. तरीसुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त कापूस खरेदी कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीने केली होती.
शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये व शेतकऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी डिजिटल पद्धतीने कापसाची नोंदणी करण्यात यावी अशा सूचना आमदार सुभाष धोटे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला केल्या होत्या. सूचनेची दखल घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीधर गोडे व इतर संचालकांनी शेतकर्‍यांना कापसाच्या नोंदणी करिता www.korpanaapmc.org.in
या वेबसाईटचा आधार दिला. हजारो शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून नोंदणी अजूनही सुरूच आहे.
एकाच सातबाऱ्यावर पूर्ण कापूस खरेदी – श्रीधर गोडे
पूर्वी एका सातबाऱ्यावर ४० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात येत होती. आता एका शेतकऱ्याचा पूर्ण कापूस एकाच सातबाऱ्यावर खरेदी होणार आहे. मात्र त्यामध्ये एका सातबाऱ्यावर पहिल्या दिवशी ४० क्विंटल, दुसऱ्या दिवशी ४० क्विंटल व तिसऱ्या दिवशी ४० क्विंटल अशा पद्धतीने खरेदी करण्यात येणार आहे. व कोणत्याही शेतकऱ्याला खाजगी व्यापाऱ्याकडे कापूस विकण्याची नामुष्की येणार नाही सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीधर गोडे यांनी दिली.

शेतकऱ्यांमध्ये आनंद
डिजिटल पद्धतीने शेतकऱ्यांच्या कापसाची नोंदणी झाल्याने व त्वरित कापूस खरेदी होत असल्याने आम्हाला आनंद झाला. आमदार सुभाष धोटे यांनी शेतकऱ्यांबाबत तत्परता दाखवून पुढाकार घेतल्याने आम्हा शेतकऱ्यांची यावर्षी गैरसोय होणार नाही.
भाऊराव कारेकर, शेतकरी, कोरपना