गुलाबी बोंडअळीचे नियंत्रणासाठी कपाशीचे फरदड घेऊ नका: जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील

0
117

चंद्रपूर, दि. 5 जानेवारी :

   कापूस पिकावरील शेंदरी/गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी फरदड न घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले असून यासाठी पुढीलप्रमाणे अतिरिक्त उपाययोजना सुचविल्या आहेत.
कापूस पीक डिसेंबर अखेर शेतातून काढुन टाकावे व फरदड घेऊ नये. डिसेंबर महिन्यानंतर ५ ते ६ महिने कापूस विरहित शेत ठेवल्यास शेंदरी बोंड अळीचे जीवनचक्र संपुष्टात येते व त्यामुळे हंगामात बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होतो. शेंदरी बोंड अळी डिसेंबर महिन्यात खाद्य नसल्यास सुप्त अवस्थेत जाते. हंगाम संपल्यावर शेतामध्ये शेळ्या, मेंढ्या तसेच इतर जनावरे चरण्यासाठी सोडावीत. कपाशीच्या पऱ्हाट्यामध्ये सुप्त अवस्था राहत असल्याने त्याची गंजी करून बांधावर ठेवु नये. कापूस पिकाचा चुरा करणारे यंत्राचा (श्रेडर) वापर करावा. पीक काढणीनंतर कपाशीच्या पऱ्हाट्या, व्यवस्थित न घडलेली किडग्रस्त बोंडे व पाला पाचोळा नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे. पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट करावी त्यामुळे जमिनीवर आलेले किडींचे कोष तसेच इतर अवस्था नष्ट होतील. जिनिंग-प्रेसिंग मिल तसेच कापूस साठवण केलेल्या जागी प्रकाश सापळे, कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स) लावावे.
अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here