अजब ! आदर्श ग्रामपंचायतीचा : गजब ! घोटाळा उघड

205

गड़चांंदुर (चंद्रपूर) :

गतवर्षी ग्रामपंचायत बिबी अनेक घोळांमुळे चर्चेत राहिली होती. ग्रामपंचायत बिबी येथील सरपंच मंगलदास गेडाम यांनी लोकवर्गणीतून बिबी ते पाटोदा, शनिशिंगणापूर, शिर्डी, हिवरेबाजार येथे आदर्श गाव अभ्यास दौरा केला. या अभ्यास दौरा करिता लोकवर्गणी काढली असताना देखील खोटे व बनावटी गाडी क्रमांकाचे बिले जोडून ग्रामपंचायतीच्या स्मार्ट ग्राम निधीतून २ लाख ४२ हजार रुपयांची उचल करण्यात आली. यासंदर्भात नागरिकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डीले यांचेकडे तक्रार केली असता चौकशीतून ‘आदर्श’ घोटाळा उघड झाला आहे. तसे सिईओंनी रक्कम वसूलीचे आदेश सरपंच व ग्रामसेवक यांना दिले असून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

स्मार्ट ग्राम निधीतून महिला सक्षमीकरण या निकषांवर बिबी ग्रामपंचायतीने १२१ महिलांचा आदर्श गाव अभ्यास दौरा राळेगणसिद्धी, पाटोदा, हिवरेबाजार येथे करण्यात आला. जिल्ह्याबाहेर शासकीय दौरा करताना सक्षम अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र ग्रामपंचायतीने अशी कुठलीही परवानगी घेतलेली नाही असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या चौकशीतून स्पष्ट झाले. गावातील नागरिकांना अभ्यास दौरा लोकसहभागातून होत असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी प्रत्येकी नागरिकांकडून एक हजार रुपये लोकवर्गणी काढण्यात आली. मात्र सदर दौऱ्याचे बिल स्मार्ट ग्राम निधीतून काढून ग्रामपंचायतीने लाखों रुपयांचा आदर्श घोटाळा केल्याचे चौकशीतून उघड झाले आहे. याबाबत सरपंचाची संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे दिली व बोलण्यास नकार दिला.